हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा अपमान, धनंजय मुंडे सरकारवर बरसले

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या स्थापनेचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार केशव आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली. ग्रामीणविकास मंत्री पंकजा मुंडे उसतोड महामंडळाच्या स्थापनेसाठी आग्रही होत्या. परंतु तांत्रिक बाबींमुळे ही स्थापना लांबणीवर पडली होती. अखेर सरकारचा कालावधी संपत असताना महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांच्या जन्मदिनी ५ वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्व. मुंडे साहेबांच्या नावे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्याचे जाहीर केले होते. परळीतील बंद कामगार मंडळाला फक्त ऊसतोड महामंडळाचा बोर्ड लावून सरकारने लोकांना फसवले. हा मुंडे साहेबांचा अपमान आहे, असा घणाघात धनंजय मुंडे यांनी केला आहे.

आचारसंहिता अवघ्या काही तासांवर असताना सरकारने आज ऊसतोड महामंडळ स्थापन केले आहे. नियम, अधिकारक्षेत्र कोणत्याही गोष्टी निश्चित नाहीत. हे लबाडा घरचं आवतान आहे. पाच वर्षे मागणी करत होतो तेव्हा जाग आली नाही. आता निवडणुकांच्या तोंडावर सरकार ऊसतोड कामगारांना गाजर दाखवत फसवणूक करत आहे, असा आरोपही मुंडे यांनी केला आहे.