‘प्रकाश आंबेडकर, रामदास आठवलेंना पवार साहेबांनी निवडून आणले’

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून राजकीय दौरे, भेटीगाठी यासारख्या राजकीय घडामोडींना उधान आले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मैदानात उतरले आहेत.

औरंगाबाद येथे शरद पवार उपस्थितीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी मोठ विधान केले आहे. त्यांनी ‘भाजपाध्यक्ष अमित शाह पवार साहेबांवर टीका करतात, पवार साहेबांनी काय केलं, असं म्हणतात. मी त्यांना सांगतो, आमच्या साहेबांनी महाराष्ट्रात जेवढे विमानतळ केले, तेवढे बस स्टॅन्ड सुद्धा तुम्हाला गुजरातमध्ये करता आले नाही असं विधान केले.

तसेच प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यावरही त्यांनी भाष्य केले. त्यांनी ‘सध्या कुणीही उठतंय आणि साहेबांवर टीका करतंय. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर सुद्धा साहेबांवर टीका करतात. पण प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात खुल्या जागेवरून निवडून आणलं, रामदास आठवले हे सुद्धा साहेबांवर टीका करतात. त्यांना सुद्धा खुल्या मतदारसंघातून निवडून आणलं. बाबासाहेबांचं समतेचं खरं तत्व पवार साहेबांनी प्रत्यक्षात आणलं असं विधान केले.

दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रसला मोठ्या प्रमाणात पक्षांतराचा फटका बसला आहे. त्यामुळे खुद्द शरद पवार कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांच्या या मेळाव्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते सरकारला लक्ष करत आहेत.