‘परळी पहिली नगरपालिका ठरणार, जी खर्च करणार नाही तर कमवणार’

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय यांच्या हस्ते परळीच्या दृष्टीने अत्यंत महत्वकांक्षी अशा मलनिस्सारण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा पार पडला. इस्त्राईल मलनिस्सारण प्रकल्पाने प्रेरीत होऊन तो प्रकल्प परळीत राबवण्याचा ध्यास घेतला. येणाऱ्या ७५ वर्षांसाठी हा प्रकल्प असणार आहे. याविषयी धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे.

थर्मल पावर प्लांटला पाणी लागतं. या प्रकल्पाच्या माध्यमातून येणारे पाणी आपण थर्मल पावर प्लांटला विकणार आहोत. प्रकल्पाच्या माध्यमातून परळी नगरपालिकेला सव्वा कोटीचा नफा होणार आहे. परळी ही देशातील पहिली नगरपालिका ठरणार जी खर्च करणार नाही तर कमवणार अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

तसेच या प्रकल्पामुळे रोगराई कमी होऊन आरोग्यदायी जीवन मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या शुभारंभाचा मला अतिशय जास्त आनंद होत आहे. जाणीवपूर्वक नगरपालिकेचा निधी अडवत आहेत. मात्र परळीच्या रस्त्यांसाठीचे १०० कोटी रुपये आपण त्यांच्या छाताडावर बसून घेऊ, सुसज्ज रस्ते तयार करू असं विधान केले आहे.

मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. विधिमंडळात परळी नगर पालिकेविरोधात प्रश्न उपस्थित केला गेला. कधी नव्हे तर सकाळी ९ वाजता सभागृह भरवले गेले. अजित पवार यांनी आपली बाजू तिथे मांडली. राष्ट्रवादीची सत्ता असल्याने खोडा घातला जात आहे.

पुढे बोलताना माझं काम हे परळीच्या विकासासाठी आहे. त्यात लोकप्रतिनिधींनी विरोध करायचे काय काम? जर मी विरोध करायचा ठरवला तर वैद्यनाथ कारखान्याचा गैरव्यवहार, वैद्यनाथ कॉलेजचे प्रकरण सगळंच बाहेर काढता येईल. परळीच्या गल्ली बोळात काय सुरु आहे हे मला चांगले माहिती आहे असं धनंजय मुंडे म्हणाले.

तसेच गेल्या अनेक महिन्यापासून परळी पाण्यापासून वंचित आहे. आम्ही मिळेल त्या माध्यमातून परळीला पाणी देण्याचा प्रयत्न केला. निवडणुका तोंडावर आहे म्हणून पालकमंत्री आज बोअरवेल देत आहेत. जेव्हा परळी पाण्यासाठी वणवण फिरत होती तेव्हा तुम्ही कुठे होतात? असा सवालही उपस्थित केला आहे.