‘…म्हणूनचं ३०३ खासदारांचा मालक पवार साहेबांना घाबरतो’

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून राजकीय दौरे, भेटीगाठी यासारख्या राजकीय घडामोडींना उधान आले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मैदानात उतरले आहेत.

औरंगाबाद येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी मोठ विधान केले आहे. त्यांनी ‘माझ्या आतापर्यतच्या प्रवासातील सर्वाधिक गर्दी या मराठवाड्याच्या तरूणाईने दाखवली. आमच्या मराठवाड्याचं प्रेमच तेवढं आहे पवार साहेबांवर. म्हणूनच आजही ३०३ खासदारांचा मालक, ५ खासदार असलेल्या आपल्या पवार साहेबांना घाबरतो असं विधान केले आहे.

दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रसला मोठ्या प्रमाणात पक्षांतराचा फटका बसला आहे. त्यामुळे खुद्द शरद पवार कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांच्या या मेळाव्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून रष्ट्र्वादीचे नेते सरकारला लक्ष करत आहेत.

धनंजय मुंडे यांनी या कार्यकर्ता मेळाव्याच्या आधीच्या सभेतही नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती आणि आताही त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेला भाजपकडूनही प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे.