सत्ता आल्यावर सत्ताधाऱ्यांना पळता भूई थोडी करू : धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला इशारा दिला आहे. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

धनंजय मुंडे यांनी ‘दिन बदलते देर नही लगती… कुछ दिनो बाद हमारा वक्त आयेगा… आणि तेव्हा यांना पळता भूई थोडी केल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा सरकारला दिला आहे. लोकसभा निवडणुकीत भले ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बहुमत मिळाले असेल तरी भोकरदनची अभूतपूर्व गर्दी पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार इथे निवडून येणार हे निश्चित आहे. फक्त ही उर्जा कायम ठेवा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

तसेच महाराष्ट्रात महापूर आला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वात आधी मदतीला धावून आली पण हे लोक यात्रा करत बसले. पूरात गेल्यानंतर सेल्फी काढत बसले असेही धनंजय मुंडे म्हणाले. तसेच अर्धे राज्य पूर परिस्थितीमुळे तर मराठवाडा दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. मात्र जनतेची मदत करण्याची दानत या सरकारमध्ये दिसली नाही. या सरकारला जमतं ते फक्त फसवेगिरी असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.

दरम्यान पुढे बोलताना मुंडे यांनी ‘ऑगस्ट महिना उलटूनही आज मराठवाड्यात पाऊस नाही. सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा शब्द दिला. ढग आले तर पण सरकारची पाऊस पाडणारी विमाने आलीच नाहीत, सरकारने मराठवाड्याची फसवणूक केली असा आरोप केला.