फडणवीस, कृषिमंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल करणार का?- धनंजय मुंडे

मुंबई – यवतमाळ जिल्ह्य़ातील उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील शामराव भोपळे या शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेतल्यामुळे शनिवारी त्याचा मृत्यू झाला. १७ हजार रुपये कर्ज होते म्हणून त्याने आत्महत्या केली. सरकारच्या निषेधासाठी काळ्या फिती लावून गावकऱ्यांनी अंत्ययात्रा काढली. गेल्या महिन्यातील यवतमाळमधील ही शेतकऱ्याची चौथी आत्महत्या आहे.

दरम्यान याप्रकरणी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीये. विरोधी पक्षात असताना हेच देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर जोरदार भाषण देत असत आणि आत्महत्येसाठी कृषिमंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी घसा फाडून मागणी करत असत. मात्र आता सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी मुख्यमंत्री कृषिमंत्र्याला जबाबदार धरून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करणार का असा सवाल त्यांनी केला आहे.

पाकिस्तानातून साखर आयात करून आता हे सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही आत्महत्येच्या मार्गावर घेऊन जाणार, असा टोलाही मुंडे यांनी लगावला. आता त्यांच्याच सरकारने फसवी कर्जमाफीची घोषणा केली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना गार करून टाकल्यामुळे गेल्या चार वर्षांत दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील गंभीर बाब म्हणजे जूनमध्ये ८९ लाख शेतकऱ्यांची ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं म्हंटलं आहे.

You might also like
Comments
Loading...