हा छत्रपती शिवरायांचा अपमान – धनंजय मुंडे

परभणी: भाजपचे जबाबदार समजले जाणारे शाम जाजु यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाच्या बाबतीत बोलणं हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. भाजपला जातीय तेढ निर्माण करायची असून मागील साडे तीन वर्षात हेच दिसून आले आहे. भिमा-कोरेगाव प्रकरणी झालेली दंगल हे सरकारचे अपयश असून जातीय तेढ निर्माण करणारे कोण आहेत? हे सरकारला माहीत नाही का असा प्रश्न विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

त्याचप्रमाणे, भिमा-कोरेगावला घडलेली दंगल हे राज्य सरकार व गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे अपयश असून या घटनेस राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप देखीक्ल धनंजय मुंडे यांनी केला आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात दुर्लक्ष का झाले? राज्य सरकार म्हणुन तुम्ही काय करत होतात? असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाडय़ात होणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या तयारीसाठी मुंडे रविवारी परभणी, हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीपूर्वी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

You might also like
Comments
Loading...