fbpx

मनसे कार्यकर्त्यासाठी धनंजय मुंडेंनी हजारोंची सभा रद्द केली

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचा टिपेला पोहोचलेला प्रचार, लोकप्रिय नेत्याला ऐकण्यासाठी जमलेली हजारोंची गर्दी, दोन तासांपेक्षा जास्त वेळ होऊनही या नेत्याच्या भाषणासाठी थांबलेली गर्दी, हे दृश्य पाहून कोणत्याही मुरलेल्या राजकारण्याला भाषण करण्याची संधी सोडावी वाटणार नाही . मात्र परळीत एका नेत्याने चक्क व्यासपीठावर येऊन ही सभा रद्द केल्याचे जाहीर करून आश्चर्याचा धक्का दिला . धनंजय मुंडे असे या तरुण नेत्याचे नाव आहे.

त्याचे असे झाले की, बीड लोकसभा मतदारसंघातील परळी शहरात गुरुवारी सायंकाळी गणेशपार या नावाजलेल्या भागात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची रात्री आठ वाजता जाहीर सभा होती. गणेशपार भागात सभा घेतली की विजय निश्चितच होतो अशी अनेक पक्षांची धारणा , त्यामुळे येथील सभा ही ऐतिहासिक समजली जाते.

त्यात धनंजय मुंडे यांचे परळी हे होम ग्राउंड असल्याने आणि या भागात त्यांची लोकप्रियता असल्याने गुरुवारी होणाऱ्या सभेसाठी प्रचंड गर्दी जमा झाली होती. सायंकाळी आठ वाजता सभेची वेळ असली तरी सहा वाजल्यापासूनच हजारो महिला आणि पुरुष सभेसाठी जमले होते. आठचा काटा साडेआठला गेला गेला तरीही या नेत्याचा सभेकडे येण्याचा कुठलाच अंदाज दिसत नसल्याने उपस्थितांमध्ये चांगलीच चलबिचल निर्माण झाली.

आणि नऊ वाजून तीस मिनिटांनी ही प्रतीक्षा संपली , लोक ज्यांची वाट पाहत होते ते धनंजय मुंडे आले.

संचलन कर्त्याच्या हातातला माईक हातात घेत मला माफ करा मी आज येथे भाषण करायला आलेलो नाही पुन्हा कधीतरी नक्कीच येईल तुमच्याशी बोलण्यापेक्षा मला आज एका गोष्टीचे वाईट वाटत आहे की या भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक सच्चा कार्यकर्ता वैजनाथ दहातोंडेंंचे काही तासांपूर्वीच दुःखद निधन झाले आहे .

वैजनाथ हा एक तरुण आणि सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा माझा चांगला मित्र होता. पक्ष कोणताही असला तरी शहरातील सामाजिक चळवळ जिवंत राहण्यासाठी अशा कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असते. वैजनाथ आणि त्याचे कुटुंबीय दुःखात असताना मला सभा घेणे योग्य वाटत नाही म्हणून आपण सर्वजण वैजनाथला श्रद्धांजली व वाहू या असे म्हणतात.

श्रद्धांजली वाहून सभा संपल्याचे जाहीर करत सर्वजण आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेले. धनंजय मुंडे यांच्या या संवेदनशीलतेची परळीकरांमध्ये चांगलीच चर्चा होती.