पिचडांनी शेतकऱ्यांची जमीन लाटली, धनंजय मुंडेंचा आरोप

पारनेर : शिवस्वराज्य यात्रेत प्रत्येक दिवशी भाजपाच्या मेगाभरती लाभार्थ्यांची पोलखोल करणार असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते पारनेरमध्ये बोलत होते. याच सभेत पिचड कुटुंबीयांवर जोरदार हल्लाबोल मुंडे यांनी केला. मधुकर पिचड यांना पवार साहेबांनी खूप काही दिले तरी त्यांनी पक्षांतर केले, अशी टीका मुंडे यांनी केली.

पिचड साहेबांनी पक्षप्रवेश केला कारण त्यांच्या पत्नीविरोधात फसवणुकीचे प्रकरण आहे. पिचड यांच्या पत्नी ज्या बिगर आदिवासी आहेत. त्यांनी खोटे आदिवासी सर्टिफिकेट दाखवून आदिवासी शेतकऱ्यांची जमीन लाटली आणि समृद्धी महामार्गाच्या नावावर सरकारकडून १४ कोटी ५० लाख रुपयांचा मोबदला घेतला. त्यामुळे पिचड यांनी भाजपत प्रवेश केल्याचा आरोप मुंडे यांनी केला.

दरम्यान, जगमित्र साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी करताना सरकारी जमिनीचे बेकायदा हस्तांतर करून घेतल्याचे आरोप मुंडे यांच्यावर आहेत. आता याच मुंडेनी पिचड कुटुंबीयांवर शेतकऱ्यांची जमीन लाटल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे नेमका विश्वास कुणावर ठेवावा असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

तर याच सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले गेले. आंदोलन केले गेले. त्यावरुन लक्षात येते की, जनतेचा आदेश काय आहे ते? मुख्यमंत्री जिथे जाईल तिथे सांगतात मी मुख्यमंत्री होणार…मी पुन्हा येणार…महाराष्ट्र कुणाची जहागीरी नाही. राज्यातील जनता त्यांचा मुख्यमंत्री निवडण्यास सक्षम आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत चित्र वेगळे असेल हे निश्चित…असा विश्वास खा. कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.

वैभव पिचड यांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक, पक्षांतराचा निर्णय अंतिम टप्यात

विधानसभेची मोर्चेबांधणी : शिवसेना-भाजपमध्ये होणार जागांची अदलाबदल

जनतेपेक्षा तुम्हाला प्रचार महत्वाचा; अजितदादांनी टोचले सत्ताधाऱ्यांचे कान