पंकजाताई, माझ्यावर टिका करण्यापेक्षा पाच वर्षांच्या विकास कामांचा हिशोब द्या- धनंजय मुंडे

शिरूर : लोकसभेची निवडणुक ही देशाच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या प्रश्नांवर लढायची असते, याचा विसरच आमच्या ताईंना पडला आहे. अहो पंकजाताई माझ्यावर टिका करण्यासाठी तुम्हाला पाच वर्ष दिले आहेत, आता निवडणुकीत पाच वर्ष तुम्हाला सत्ता दिल्यानंतर तुम्ही जिल्ह्याचा काय विकास केला ? याचे उत्तर द्या असे आव्हान विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

बीड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे आज आष्टी विधानसभा मतदार संघाच्या दौर्यावर असुन, शिरूर येथील पहिल्या जाहीर सभेत ते बोलत होते. सभेला जमलेला विराट जनसमुदाय आणि मागील काही दिवसात प्रचार सोडुन केवळ पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या व्यक्तिगत टिकेला धनंजय मुंडे यांनी चोख पणे उत्तर देताना भावनेवर जातीवर मतदान किती दिवस मागणार ? हिंमत असेल तर विकास कामांवर निवडणुक लढवायची हिंमत दाखवा असे आव्हान दिले.

पंकजाताई स्वतःला वाघीण समजतात मात्र शेतकर्याच्या मुलाची गुल्हेर म्हणुन तुम्ही अवहेलना करू नका, पक्का शिकारी असेल आणि नेम बसला तर गुल्हेरने ही वाघाची शिकार होऊ शकते, हे लक्षात ठेवा असा इशारा मुंडे यांनी दिला. गल्ली ते दिल्ली संपुर्ण सत्ता दिली आहे आता तुमच्या घरी फक्त पाणी भरणे शिल्लक आहे, ते ही भरायचे का सांगा ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मंत्रिमंडळात असताना स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाचे ऊसतोड महामंडळ रद्द होत असताना गप बसणार्या तुम्ही कसल्या वारसदार ? असा सवाल केला. बीड मधील 78 सिंचन प्रकल्पापैकी एकतरी प्रकल्प पुर्ण झाला का ? तुम्ही दबंग खासदार होता तर रेल्वे डब्याचा कारखाना लातूरला कसा गेला ? रेल्वेने उमेदवारी अर्ज भरायला येणार होतात, या कामाची स्पीड बघता किती वर्ष लागतील ? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.