‘पंडित अण्णांनी मुंडे साहेबांसाठी वार सहन केले तेव्हा तुमचा जन्म तरी झाला होता का ?’

शिरूर : स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्यासाठी प्रत्येक निवडणुकीत स्व.पंडितअण्णा मुंडे यांनी अंगावर असंख्य वार खाल्ले, त्यावेळी तुमचा जन्म तरी झाला होता का ? तुमची उमेदवारी पक्षाने मुंडे साहेबांनी नाही तर अण्णांनी जाहीर केली होती, याचे तरी भान ठेवा, अशा शब्दात राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुनावले आहे. माझ्यावर किती ही टिका केली तरी हरकत नाही, मात्र कधी तरी रडापडी,भावनिकता आणि जातीपाती पलीकडे जाऊन विकासावर निवडणुक लढवण्याची हिंमत दाखवा असे आव्हान त्यांनी दिले.

लोकसभेची निवडणुक ही देशाच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या प्रश्नांवर लढायची असते, याचा विसरच आमच्या ताईंना पडला आहे. अहो पंकजाताई माझ्यावर टिका करण्यासाठी तुम्हाला पाच वर्ष दिले आहेत, आता निवडणुकीत पाच वर्ष तुम्हाला सत्ता दिल्यानंतर तुम्ही जिल्ह्याचा काय विकास केला ? याचे उत्तर द्या असे आव्हान विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

बीड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे आज आष्टी विधानसभा मतदार संघाच्या दौर्यावर असुन, शिरूर येथील पहिल्या जाहीर सभेत ते बोलत होते. सभेला जमलेला विराट जनसमुदाय आणि मागील काही दिवसात प्रचार सोडुन केवळ पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या व्यक्तिगत टिकेला धनंजय मुंडे यांनी चोख पणे उत्तर देताना भावनेवर जातीवर मतदान किती दिवस मागणार ? हिंमत असेल तर विकास कामांवर निवडणुक लढवायची हिंमत दाखवा असे आव्हान दिले.

दरम्यान, बीड जिल्ह्यात परितर्वन घडलेच पाहीजे त्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री सुरेश नवले, माजी आ. अमरसिंह पंडित यांनी केले. या सभेस रोहिदास पाटील, माजी आमदार राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, जनार्धन तुपे, ज्येष्ठ नेते रविंद्र क्षीरसागर, माजी जि.प.अध्यक्ष शिवाजी राऊत, रामकृष्ण बांगर, बाळासाहेब आजबे, सतिश शिंदे, महेबुब शेख, नामदेव चव्हाण, सौ.चंपावतीताई पानसंबळ, तुरूकमारे, मोहनराव ढाकणे, राजेंद्र खेडकर, बाबुराव झिरपे, सुरेश थोरात, धर्मा जायभाये, बारीकराव खेंगरे, पांडुरंग विघ्ने, सुग्राभाभी पठाण, बाळासाहेब बडे, सुनिल नागरगोजे, राम शेळके, शेख नसीर, अनंत जावळे, सुभाष गाडेकर, भगवान सानप, भिमराव गायकवाड, नारायण जरांगे, विश्वास नागरगोजे, सतिष बडे, गोकुळ सवासे, अमोल चव्हाण, बबनराव गरकळ, संतोष जरांगे, अंबादास गोरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पंकजाताई स्वतःला वाघीण समजतात मात्र शेतकर्याच्या मुलाची गुल्हेर म्हणुन तुम्ही अवहेलना करू नका, पक्का शिकारी असेल आणि नेम बसला तर गुल्हेरने ही वाघाची शिकार होऊ शकते, हे लक्षात ठेवा असा इशारा मुंडे यांनी दिला. गल्ली ते दिल्ली संपुर्ण सत्ता दिली आहे आता तुमच्या घरी फक्त पाणी भरणे शिल्लक आहे, ते ही भरायचे का सांगा ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मंत्रिमंडळात असताना स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाचे ऊसतोड महामंडळ रद्द होत असताना गप बसणार्या तुम्ही कसल्या वारसदार ? असा सवाल केला. बीड मधील 78 सिंचन प्रकल्पापैकी एकतरी प्रकल्प पुर्ण झाला का ? तुम्ही दबंग खासदार होता तर रेल्वे डब्याचा कारखाना लातूरला कसा गेला ? रेल्वेने उमेदवारी अर्ज भरायला येणार होतात, या कामाची स्पीड बघता किती वर्ष लागतील ? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.