‘वंचितला मदत म्हणजे जातीयवादी भारतीय जनता पार्टीला मदत’

dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यांनी परळी येथे बोलताना वंचित बहुजन आघाडीला मदत म्हणजे जातीवादी भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासारखे आहे. याचा अनुभव लोकसभा निवडणुकीत घेतला आहे. पुन्हा तीच चुक करून आपले मत वाया घालवू नका, वंचितचं भूत या निवडणुकीत डोक्यातून काढा अन तुमच्यासाठी राबणाऱ्या लेकराला निवडून द्या असं विधान केले आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीमुळं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीला 3 जागा देत होतो. मात्र आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जास्तीच्या जागांची मागणी केली. त्यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत निवडणूक लढवली असती तर आज त्यांच्या 3 जागा अन महागटबंधनच्या 12 जागा निवडून आल्या असत्या. अनेक ठिकाणी केवळ वंचित आघाडीमुळं आमचे उमेदवार पराभूत झाले आहेत असंही मुंडे म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढे बोलताना ‘या देशात संघाकडून घटना बदलण्यासाठी अभ्यास सुरू आहे. आज देशाचं संविधान धोक्यात आहे, देशाची लोकशाही धोक्यात आहे. मात्र वंचित ही याच संविधान बदलू पाहणाऱ्या, भाजपला सत्तेपासून वंचित ठेवायचं नाही म्हणून आहे मदत करत आहे असा आरोप मुंडे यांनी केला आहे.