संतापजनक: आईला बघून निर्भयाच्या सुंदरतेचा अंदाज येऊ शकतो! पोलिसाचं वादग्रस्त वक्तव्य

H.T-Sangliana

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटक राज्याचे माजी पोलीस महासंचालक एच. टी सांगलियाना यांनी निर्भयाच्या आईला उद्देशून एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सांगलियान यांनी हे वक्तव्य महिलांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात केल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.

२०१२ मध्ये दिल्लीत निर्भयावर पाशवी अत्याचार करण्यात आले होते. मृत्यूशी तिने दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली होती आणि तिचा मृत्यू झाला होता. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आशा देवी यांनी संघर्षमय कायदेशीर लढा द्यावा लागला होता . कायदेशीर लढा देणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ कर्नाटकची राजधानी बंगळुरुत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात निर्भयाच्या आई आशा देवी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आपल्या मुलीसाठी एक दीर्घ न्यायालयीन लढा लढणाऱ्या आशा देवी यांना सन्मानित करण्यात आलं.

बंगळुरु मिररने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकची राजधानी बंगळुरुत महिलांचा सन्मान करण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना एचटी सांगलियाना यांनी निर्भयाच्या आईविषयी बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं. सांगलियाना यांनी निर्भयाची आई आशा देवी यांच्याबद्दल बोलताना म्हटलं की, ‘त्यांची शरिरयष्टी पाहिल्यानंतर निर्भया किती सुंदर असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो’. त्यांच्याबद्दल बोलताना एचटी सांगलिया म्हणाले की, ‘मी निर्भयाच्या आईला पाहू शकतो. त्यांच्याकडे किती चांगली शरिरयष्टी आहे. त्यांच्याकडे पाहूनच निर्भया किती सुंदर असेल याचा अंदाज लावू शकतो’.

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरूनही त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘जर तुमच्यावर कुणी बळजबरी करत असेल तर सरळ परिस्थितीला शरण जा. नंतर कायदेशीर लढाई लढता येईल. पण, तुमचा जीव वाचवा.’ असं सांगलियान यांनी या भाषणात म्हटलं. या कार्यक्रमात बंगळुरुच्या प्रसिद्ध आयपीएस डी रुपादेखील उपस्थित होत्या. डी रुपा यांनी कार्यक्रमातील काही फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटला शेअर केले आहेत.