मी पुन्हा कोणत्या भूमिकेत येईन, हे मात्र देवेंद्रभाऊंनी सांगितले नाही – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेच्या कामकाजात सत्ताधारी पक्षांसह विरोधीपक्षनेते पदाची अनेक वर्षांची परंपरा आहे. विरोधीपक्षनेते म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उल्लेखनीय कामगिरी करतील व केवळ विरोधाला विरोध न करता ‘देवेन्द्रभाऊ’ या सभागृहाचा डेकोरम जपतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेचे माजी विरोधीपक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदन प्रस्तवावर भाषण करताना व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांचा कामकाजाचा आलेख कायम चढता राहिलेला आहे, त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक पदे भूषवली परंतु त्यांना विरोधीपक्षनेते पदी बसायची संधी अजून मिळाली नव्हती, देवाला याची काळजी वाटली असावी आणि नियतीने महा विकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून फडणवीस यांना विरोधीपक्षनेते य पदावर काम करण्याचीही संधी देत देवाने फडणवीस यांच्या आलेखात भर घातली, अशी कोपरखळीही मुंडे यांनी आपल्या भाषणातून मारली.

‘मी पुन्हा येईन’ असं देवेंद्र भाऊ म्हणाले परंतु मी पुन्हा कोणत्या भूमिकेत येईन, हे मात्र त्यांनी सांगितले नाही आणि अखेर नियतीने फिरवलेल्या चक्रामुळे ते पुन्हा आले परंतु मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर विरोधीपक्षनेते म्हणून, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीचे स्वागत करीत अभिनंदन केले.

सत्ताधारी पक्ष म्हणून काम करताना, जनतेचे प्रश्न सोडवताना मागील सरकारमध्ये आपण केलेल्या कामामुळे पुढे होणारी अडचण व पुढे अपेक्षित असलेल्या कामांमध्ये, केवळ विरोधाला विरोध करू नये, आपणही पूर्वी विरोधी पक्षनेते होतो, त्यामुळे काम करण्याबरोबरच उत्तर देणेही आपल्याला माहीत आहे असे म्हणत सभागृहाचे महत्व आणि डेकोरम जपण्याची अपेक्षाही धनंजय मुंडेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

Loading...