‘मेगा गळती लागली असल्याने विरोधकांनी केवळ आता आत्मचिंतन करावे’

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजप सेनेत प्रवेश केला आहे. तर काही नेते अजूनही पक्षांतराच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे या पक्षांतराचा मोठा फटका राष्ट्रवादी पक्षाल बसला आहे. आता तर नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आणि माजी आ. गणेश नाईक यांनी देखील भाजपात ४८ नगरसेवकांसह प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे.

या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात येणाऱ्या नेत्यांच स्वागत केले असून विरोधकांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले की, काहींना आमच्याकडे सुरु असलेल्या मेगा भरतीची चिंता वाटत आहे. त्यांनी याचा विचार करण्यापेक्षा आपल्या पक्षाला मेगा गळती का लागली याविषयी आत्मचिंतन करावे.

तसेच भारतीय जनता पार्टी हा मोठा परिवार आहे. या परिवारात सहभागी झालेल्या सदस्यांच स्वागत करुन आम्हाला परिवार विस्तार करण्यात आनंद होत आहे. आमच्याकडे येणारी लोक सत्ता किंवा पदासाठी आलेली नाहीत. तर देशाच्या विकासात योगदान देण्याच्या हेतून आली आहेत, असे ही फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी पक्षाला नवी मुंबईत मोठे खिंडार पडले. तब्बल ४८ नगरसेवकांनीही भाजपचा झेंडा हाती पकडल्याने नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व धोक्यात आले आहे. तसेच महापालिकेवरील सत्तेला देखील मुकावे लागणार आहे.