शिवसेनेचे मंत्री शेतकर्‍यांचा गळा घोटतात, फडणवीसांचा गडाखांवर घणाघात

gadakh - fadnvis

अहमदनगर : मुळा सहकारी साखर कारखान्याने उसाला तोड दिली नाही, असा आरोप करत नेवासा तालुक्यातील करजगाव येथील शेतकरी अशोक टेमक यांनी शेतातच अडीच एकर उभा ऊस पेटवून दिला. विधानसभा निवडणुकीत मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या विरोधात काम केल्याने कारखान्याने आमचा ऊस नेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबीची दखल घ्यावी, अन्यथा उसातच आत्मदहन करू असा इशारा शेतकरी ऋषिकेश शेटे यांनी दिला आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही मुळा कारखाना शेतातील ऊस तोडून नेत नसल्याचा आरोप शेतकरी अशोक टेमक व ऋषिकेश शेटे यांनी केला. उसाला तोड दिली जात नसेल तर शेतातच पेटवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला होता. अशोक टेमक यांनी गुरुवारी दुपारी करजगाव येथील देवखिळे वस्ती येथील अडीच एकर ऊस पेटविला.

आता या प्रकरणावरून चांगलाच राजकारण तापायला सुरवात झाली आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शंकरराव गडाख यांना चांगलच फैलावर घेतले आहे. ‘दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्‍या शिवसेनेचे मंत्री शेतकर्‍यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्‍या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही’. अस म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे.

तर, आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्‍यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्‍यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्‍यांनी जगायचेच नाही. नेवाशात शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून हा प्रताप चालवलाय. असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी तत्काळ हस्तक्षेप करीत या शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा, ही माझी माफक अपेक्षा आहे. किमान अन्नदात्याला तरी पक्षीय चष्म्यातून बघू नका. अस देखील फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या