मुंबई : गेल्या दोन वर्षात झालेल्या ग्रामपंचायत ते नगरपंचायत व इतर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना खाली खाली गेली आहे. (Shivsena) ज्या पक्षाचा राज्यात मुख्यमंत्री आहे, तो पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असं माजी मुख्यमंत्री तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. नगरपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर शिवसेना चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे त्यावरून शिवसेनेवर चांगलीच टीका होत आहे.
नगरपंचायत निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला, त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी लोकांचा विश्वास अजूनही भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला. पुढे ते म्हणाले, शिवसेनेची कामगिरी गेल्या दोन वर्षात प्रचंड खाली गेली आहे. हिंदुत्व आणि हिंदुत्वाची वोटबॅंक ही काही एकट्या शिवसेनेची मक्तेदारी नव्हती. ती आमच्याकडे देखील होती, पण आता शिवसेनेकडे हिंदुत्व शिल्लक राहिलेच नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीतील शिवसेना आणि कॉंग्रेसच्या जोरावर राष्ट्रवादी राज्यात आपली ताकद वाढवत आहे. विशेषतः शिवसेनेच्या मतदारसंघात जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला तिथे त्याला ताकद देण्याचे काम त्यांचे नेते करतायेत. त्यामुळे शिवसेनेच्या विद्यमान आमदाराला निधी मिळत नाही, त्याचे काम होत नाही, पण पराभूत झालेल्या, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे काम होते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे काल हाती आलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर खरी पंचाईत शिवसेनेचीच झाली असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या: