चंद्रकांत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा : येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेची सत्ता येणार हे भाजप युतीच्या नेत्यांनी गृहीत धरले आहे. त्यामुळे भाजप सेनेत आता मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु आहे. त्यात आता भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. पक्ष श्रेष्ठींनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली तर का सोडायची ? असे म्हणत मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा व्यक्त केली आहे. तर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्कील उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, चंद्रकांतदादा काय बोलले आहेत याबद्दल माझं त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही. आमच्या पक्षात निवडून आलेले आमदार आणि केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री ठरवत असतात.त्यानुसार सध्यातरी मी मुख्यमंत्री आहे. त्यमुळे तुमची कृपा आणि आशीर्वाद असतील तर मी पुन्हा मुख्यमंत्री होईल. दादा आत्ताच प्रदेशाध्यक्ष झाले आहेत त्यांना स्थैर्य मिळू द्या.

चंद्रकांत पाटील शुक्रवारी पुण्यात होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले. माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे. पक्ष देईल ते काम करायला आवडेल. पुण्यातील कसबा काय तर गडचिरोलीत जाऊन पण लढायची पण तयारी आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी निभावेन. पक्षाने मुख्यमंत्रीपद दिले तर का सोडायचं ?, असे पाटील म्हणाले.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महाजनादेश यात्रेवर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही यात्रा अतिशय महत्वाची मानली जात आहे. या यात्रेवर मुख्यमंत्री फडणवीस गेल्या ५ वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेत आहेत. तर यात्रेद्वारे ते लोकांशी संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील जन आशीर्वाद यात्रेवर आहेत. त्यामुळे भाजप-सेना युतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत.