राज्यात लागलेल्या राष्ट्रपती राजवटीला देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत : युवक काँग्रेसचा आरोप

blank

अकोला : महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चालत आलेल्या सत्तानाट्याचा खेळ अखेर राष्ट्रपती राजवट लागल्यानंतरच शांत झाला. महाराष्ट्रात या परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू होणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासावर या गोष्टीचा परिणाम होईल आणि महाराष्ट्रात लागलेल्या राष्ट्रपती राजवटीसाठी काळजीवाहु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप हेच कारणीभूत आहेत असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी केला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल दिनांक २४ ऑक्टोबर रोजी लागल्यानंतर राज्यातील जनतेने स्थिर सरकार मिळावं म्हणून भाजप सेना महायुतीला जनादेश दिला.आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला. सुरुवातीच्या पहिल्या दिवसांपासूनच महाआघाडीचे नेते मा.पवारसाहेब आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप सेनेने सरकार स्थापन करावं आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल आहे आम्ही विरोधी पक्षातच बसू अशी भूमिका जाहीर केली.

परंतु गेल्या २२ दिवस चाललेल्या सत्तानाट्यातील १९ दिवस भाजपा शिवसेनेत काय ठरलं हे एकमेकांना सांगण्यातच भाजपने वेळ गमावला आणि १९ व्या दिवशी सरकार स्थापन करू शकत नाही अशी भूमिका भाजपने घेतली. या गोष्टीला देवेंद्र फडणवीस यांचा मीपणा व कुठल्याही परिस्थितीत मीच मुख्यमंत्री असा अट्टहास कारणीभूत आहे.

ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद भाजप शिवसेनेला देत नाही त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आता भाजपचा खोटेपणा मान्य करायचा नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली. आणि मग पाठिंब्यासाठी शिवसेनेने महाआघाडीचा दार ठोठावले.

स्वाभाविकपणे शिवसेना आणि काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस या पक्ष्यांच्या विचारधारा वेगळया आहेत. त्यांना एकत्र येऊन सरकार स्थापन करायचे असेल तर तात्त्विक मुद्द्यांवर एकमत करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळायला पाहिजे होता. तो वेळ मिळाला नाही. राज्यपालांनी भाजपला ४८ तासांचा वेळ दिला आणि राष्ट्रवादीला २४ तासांचा वेळ दिला. एवढ्या कमी वेळात तीनही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणं हे शक्य नसल्यामुळे शिवसेना वआघाडीचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही. आणि पर्यायाने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

केवळ स्वतःच्या मी पणामुळे व मुख्यमंत्री बनण्याच्या हट्टामुळे, राष्ट्रपती राजवट लागली तरी चालेल परंतु मित्रपक्षाला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देणार नाही अशा देवेंद्र फडणवीस यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. असे मत कपिल ढोके ह्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती अत्यंत भयावह आहे परतीच्या पावसामुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश देऊन, राज्यात स्थिर सरकार येईल व शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडेल, अशा आशेने मतदान केले असताना केवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या हट्टापायी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली आणि महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न वाऱ्यावर पडले. या सर्व पापासाठी भाजप आणि देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. महाराष्ट्रात परत मध्यावधी निवडणुका झाल्यास महाराष्ट्रातील जनता भाजप आणी देवेंद्र फडणवीस यांना माफ करणार नाही व त्यांची जागा त्यांना दाखवून देइल असे मत कपिल ढोके ह्यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या