मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान झालं. या निवडणुकीत खरी चुरस हि काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्ये होती. तसेच राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी आजारी असलेल्या आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना पुन्हा एकदा मुंबईत आणण्यात आले होते.
आज या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले आहे. मात्र काँग्रेसने भाजपच्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप या दोन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतल्याने मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून काँग्रेसच्या आक्षेपावर निर्णय होत नाही, तोपर्यंत मतमोजणीला सुरुवात होणार नाही.
दरम्यान, काँग्रेसच्या आक्षेपाला भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे. काँग्रेसनं घेतलेल्या आक्षेपावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा तर असंवेदनशीलतेचा कळस असल्याचं म्हणत काँग्रेसच्या आक्षेपावर प्रतिक्रिया दिली आहे. तर राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडी दोघांनीही मतदानावर आक्षेप घेतले होते. या निवडणुकीत भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मतदान केले होते. परिस्थिती बिकट असताना दोन्ही आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु महाविकास आघाडीने खालच्या पातळीचं राजकारण सुरू केले आहे, असं भाजप आमदार संजय कुंटे म्हणालेत.
दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने घेतलेले आक्षेप बालिशपणाचे असून, ३ दिवसापूर्वी निवडणूक आयोगाकडून अशाप्रकारे लेखी परवानगी घेतली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतही असेच मतदान झाले होते. लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी नियमानुसारच मतदान केले. मग आताच्या निवडणुकीत आक्षेप का? यात कुठलीही अडचण नाही. निवडणूक अधिकारी याबाबत निर्णय देतील. टाईमपास करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा म्हणून हा आक्षेप घेण्यात आला आहे, असं महाजन म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :