‘…त्यानंतर शिवसेनेला अक्कल यायला हवी होती, मात्र आतातरी त्यांनी आपली इज्जत आपणच राखावी’

devendra fadnavis vs uddhav thakrey

मुंबई : पश्चिम बंगाल मध्ये येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप मध्ये दररोज राजकीय वातावरण तापत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालं आहे. रोड शो, सभा, लंच डिप्लोमसी आणि छोट्यामोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश आदी मार्गांनी भाजपने बंगालमध्ये कमळ उमलावे यासाठी रणनीती आखली आहे.

अशातच, बिहार निवडणुकांनंतर शिवसेना पश्चिम बंगालमध्ये देखील निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी टाइम्स नाऊने वृत्त दिले होते. त्यानुसार पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा पश्चिम बंगालचा दौरा करू शकतात. शिवसेना कोलकाता, हुगळी, दमदमसह अनेक भागांत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

आज ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याच्या इराद्यावर देखील सडकून टीका केली आहे. ‘बिहार निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यानंतर शिवसेनेला अक्कल आली पाहिजे होती. मात्र, आता पुन्हा ते पश्चिम बंगालमध्ये उमेदवार उभे करत आहेत. तेथेदेखील हीच गत होईल. किमान आतातरी शिवसेनेनं आपली इज्जत आपणच राखावी,’ अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या