‘मंदिरांपेक्षा जास्त गर्दी दारुच्या दुकानांमध्ये, मग मंदिरं बंद का ?’ 

devendra fadnvis

पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. ज्या निर्बंधातून आणखी सुटका झालेली नाही. राज्यातील अनेक निर्बध शिथिल केले आहेत. मात्र मंदीरे उघडण्याची सरकारने आणखी परवानगी दिलेली नाही. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

‘जेवढी गर्दी बारमध्ये होते, त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरामध्ये होते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे?’, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

‘आम्हा हिंदूंचे 33 कोटी देव आहेत. आम्हाला देव कुठेही भेटतो. पण हारवाल्यांपासून ते पुजाऱ्यांपर्यंत या गरीब लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. मंदिरे बंद ठेवणे ही राज्य सरकारची चूक आहे. तुम्ही दारुची दुकाने उघडता आणि मंदिरे बंद असं का?’, असा सवाल यावेळी फडणवीसांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

‘राज्यातील शाळा सुरु करण्याबाबतही सरकार गोंधळलेले आहे. याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसतो आहे. शाळेबाबतीत धरसोड धोरण न ठेवता एक निश्चित धोरण राबवलं तर पालक आणि विद्यार्थी संभ्रमात राहणार नाहीत’, असा सल्लाही फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या