देवेंद्र फडणवीस आणि समीर मेघे हाजीर हो! नागपूर खंडपीठाने बजावली नोटीस

टीम महाराष्ट्र देशा: नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत वेगवेगळ्या निवडणूक याचिकांमध्ये माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार समीर मेघे यांना नोटीस बजावून १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ऍड. सतीश उके यांनी फडणवीस तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय घोडमारे यांनी मेघे यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूर तर, मेघे हिंगणा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.दोन्ही नेते राज्यातील मान्यवर नेते आहेत.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फडणवीस यांचे नामनिर्देशनपत्र व प्रतिज्ञापत्र चुकीच्या पद्धतीने स्वीकारले. प्रतिज्ञापत्र वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी विलंब करण्यात आला. व नामनिर्देशनपत्र व प्रतिज्ञापत्रातील अनेक त्रुटी अवैधपणे दूर करण्यात आल्या. यासह अन्य विविध गैरप्रकार फडणवीस यांना लाभ पोहचविण्यासाठी करण्यात आला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यात आले, असा उके यांचा आरोप आहे.

तर घोडमारे यांनी बोगस मतदारांचा मुद्दा मांडला आहे. मेघे यांनी वर्धा जिल्ह्यातील सुमारे ५० हजार मतदारांची नावे हिंगणा मतदारसंघात नोंदवली. त्यापैकी अनेक मतदार मेघे यांच्या संस्थांमध्ये कर्मचारी आहेत. त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा मिळाला, असे घोडमारे यांचे म्हणणे आहे. उके यांनी स्वत: तर, घोडमारेतर्फे ऍड.आनंद देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

आता याच प्रकरणात पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.