लालू-नितीश कुमार,मायावती- मुलायम हे एकत्र येऊ शकतात, तर शिवसेना आणि भाजप का नाही ?

CM

मुंबई : ‘दसरा मेळाव्यात शिवसेनेने हिंदुत्वाचाच पुरस्कार केला असून, देशात हिंदुत्वावर काम करणारा भाजप हाच एकमेव पक्ष आहे. एकमेकांचे तोंड न पाहणारे लालूप्रसाद यादव व नितीश कुमार, मायावती व मुलायम हे एकत्र येऊ शकतात, तर शिवसेना आणि भाजप, जे जन्मभर एकत्र राहिले, ते एकत्र येतीलच’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ‘शिवसेनेसोबत जी युती होईल, ती लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांसाठी होईल’, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

युती म्हणून कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सरकारचा विषय छेडला असता, मुखमंत्री म्हणाले, ‘आमच्यात काही मुद्द्यांवरून वाद होतो. पण त्याचा परिणाम सरकारच्या कारभारावर होऊ दिला नाही. मंत्रिमंडळ बैठकीत संयुक्त निर्णय घेतले. अडचणीच्या गोष्टीवर सखोल चर्चा करून एकमत होते व मगच निर्णय होतो. सरकारचा कारभार चालवताना आम्ही बऱ्यापैकी एकत्र काम केले. आता पक्ष म्हणून ते त्यांच्या भूमिका मांडत असतात आणि आम्ही आमच्या भूमिका मांडतो’, असे ते म्हणाले. शिवसेनेने २०१९मध्ये आपलाच मुख्यमंत्री होईल, असे म्हटले आहे, याकडे लक्ष वेधले असता, असे प्रत्येक पक्षालाच वाटते. मुख्यमंत्री आपला व्हावा, असे कोणत्या पक्षाला वाटत नाही’, असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी केला.