अजूनही तरुणांना नियुक्त्या न मिळणं हे दुर्देवी : देवेंद्र फडणवीस

devendra fadnvis

मुंबई : मराठा आरक्षण महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62/2018 मधील कलम 18 नुसार मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी मराठा समाजाचे तरुण आंदोलन करत आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात गेल्या २७ दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे.

सकल मराठा समाज पुरस्कृत एसईबीसी आणि ईएसबीसी उमेदवारांचं आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि नितेश राणे यांनी आज आझाद मैदान येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांना संबोधित करताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “मराठा समाजाच्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आम्ही वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर कलम 18 चा समावेश केला. सगळ्या मराठा उमेवारांना नियुक्त्या मिळाव्यात यासाठी कायदे केले. उच्च न्यायालयाने हा कायदा वैध ठरवला. सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती दिली नाही. मात्र, मात्र, अजूनही तरुणांना नियुक्त्या न मिळणं हे दुर्देवी आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“नियुक्त्या देणं हे सरकारच्या हातात आहे. याअगोदरही आझाद मैदानात मराठा समाजाच्या तरुणांनी आंदोलनं केली. मात्र, आम्ही त्यांना जास्त वेळ बसू दिलं नाही. आता सुरु असलेल्या आंदोलनाला 27 दिवस झाले. हे दुर्देवी आहे. याबाबत कायदेशीर मुद्यावर सरकारला प्रश्न विचारु. मराठा उमेदावारांना नियुक्त्या का दिल्या नाहीत? हा प्रश्न विचारु. हा पक्षाचा मुद्दा नाही. सरकार हे प्रश्न अयोग्य पद्धतीने हाताळत आहे”, अशी टीका फडणवीस यांनी केली.