शिवसेनेच्या वर्धापन दिनाला प्रथमचं दुसऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री उपस्थित रहाणार

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे निमंत्रण स्वीकारले आहे. माटुंगा येथील षण्मुखांनाद सभागृहात सायंकाळी ५ वाजता शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे.

उद्या १९ जून ला शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन, वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्यात आले आहे. परंतु राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असल्याने मुख्यमंत्री फडणवीस वर्धापन दिनाला उपस्थित राहणार का नाही असा प्रश्न उपस्थित झला होता, मात्र फडणवीस यांनी शिवसेनेचे वर्धापन दिनाचे निमंत्रण स्वीकारले असून, मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून वर्धापन दिनी उपस्थित राहणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही भूमिका घेतली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर पहिल्यांदाच अन्य पक्षातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना, ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी करावयाचा पाठपुरावा, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी असलेल्या सरकारी योजनांची कार्यवाही, यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.