महाजनादेश यात्रेवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

टीम महाराष्ट्र देशा:- लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यासारख्या राजकीय घडामोडींना उधान आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहे. ही यात्रा आज १४ सप्टेंबरला पुण्यात दाखल होत आहे.

पण त्याआधी पुण्यातील मेहेंदळे गॅरेज चौकात यात्रेचे होर्डिंग लावण्याच्या वादातून कोथरूडच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी आणि तिकिटासाठी इच्छुक नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यात चांगलीच जुंपलेली पाहिला मिळाली. कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांचे मोबाइल फोडणे, कानशिलात मारणे, डोके फोडणे इथपर्यंत कार्यकर्ते भिडले. वादानंतर दोन्ही बाजूंनी शांत राहणेच पसंत केले. पोलिसांत तक्रार दाखल झाली नाही.

याबाबत आमदार मेधा कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांचा जीव होर्डिंगपेक्षा मोलाचा असून चूक नसतानाही आम्ही समंजणपणे प्रकरण हाताळले. ही घटना पक्षातील वरिष्ठांना कळवली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दुसरीकडे, मोहोळ म्हणाले की, परवानगीनेच होर्डिंग लावले होते. मात्र, दादागिरी करून त्यावर आमदार कुलकर्णींचे होर्डिंग लावले गेले. तरीही आम्हीच शांत बसलो,अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज, १४ सप्टेंबरला पुण्यात दाखल होत आहे. संध्याकाळी मुख्यमंत्री फडणवीस खास बस मधून पूर्ण शहरातून फिरणार आहेत. पुण्यात सर्वच्या सर्व ८ ही आमदार भाजपचे आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर फ्लेक्स आणि बॅनरमय झाले आहे.