मुद्रा बँक योजनेची सर्वंकष माहिती देणारे वेब पोर्टल विकसित करावे – मुनगंटीवार

मुंबई  : मुद्रा बँक योजनेची राज्यातील अंमलबजावणी, योजनेतील यशकथांची माहिती देऊन प्रचार आणि प्रसिद्धी करणारे वेब पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागाने तत्काळ विकसित करावे, अशी सूचना वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील मुद्रा बँक योजनेच्या अंमलबजावणीची सर्वंकष माहिती या वेब पोर्टलवरून मिळू शकेल इतके हे वेब पोर्टल परिपूर्ण असावे असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, समिती सदस्यांनी मुद्रा बँक योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवावी.

कमी मानव विकास निर्देशांक असलेल्या जिल्ह्यांमध्ये योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जावी. समिती सदस्यांनी बँकांच्या सहकार्याने मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज वितरणाचे मेळावे आयोजित करावेत, योजनेची माहिती सांगणाऱ्या सभा घ्याव्यात समिती सदस्यांनी आपापल्या भागात मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून १ हजार लोकांना रोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवावे, युवक- युवतींना, गरजू व्यकतींना कौशल्य विकासाशी जोडून प्रकल्प अहवाल तयार करण्यापर्यंत आणि मुद्रा योजनेतून कर्ज मिळवून देऊन स्वयंरोजगार सुरु करण्यापर्यंत सहकार्य करावे, असे झाल्यास काही महिन्यांच्या कालावधीत आपण ३६ जिल्ह्यात ३६ हजार लोकांना रोजगार मिळवून देऊ शकू. यातून राज्यात एक रोजगार आंदोलन आपल्याला उभे करता येईल, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी यांनी मुद्रा बँक योजनेच्या जिल्हास्तरीय समित्यांची दर महिन्याला बैठक घेऊन योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा असे सांगून श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, बँकांनी त्यांच्या जिल्हयाचे मुद्रा बँक योजनेअंतर्गत असलेले कर्जाचे उद्दिष्ट आणि आतापर्यंत दिलेले कर्ज याचा एक फलक बँकेत लावावा. तसेच जिल्ह्यात बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाचे उद्दिष्ट कोणत्या निकषांवर निश्चित होते, याची माहिती पुढील बैठकीत द्यावी. ज्या जिल्ह्यात योजनेत सर्वाधिक कर्ज वितरित होत आहे त्या जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांचा गौरव केला जावा असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले,जिल्हास्तरावर अशासकीय सदस्यांची लवकरात लवकर नियुक्ती केली जावी. मुद्रा बँक योजनेची अंमलबजावणी अधिक वेगाने करताना समिती सदस्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती एकत्र करून सदस्यांनी ती यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवावी, जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांशी संवाद साधून या अडचणींचे निराकरण करावे. योजनेचा लाभ देऊन दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी कसे करता येईल याचा एक सविस्तर आराखडा तयार केला जावा. कोणत्या शहरात ओला कॅब्सची किती क्षमता आहेत याची माहिती पुढील बैठकीत देण्यात यावी, त्याप्रमाणे पुढील दिशा ठरवता येईल, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

मुद्रा बँक योजनेंतर्गत कर्ज दिल्यानंतर कितीजणांनी स्वयंरोजगार सुरु केले, ते कशाप्रकारे सुरु आहे, याकडे तसेच रोजगार सुरु केल्यानंतर येणाऱ्या अडचणी सोडविण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले. बैठकीत नियोजन विभाग, राज्यस्तरीय बँकर्स समिती, मुद्रा बँकेचे प्रतिनिधी, ओला कॅब्स, रुरल एम्प्लॉएमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्युट, जिल्हा नियोजन अधिकारी ठाणे, जिल्हा नियोजन अधिकारी, मुंबई उपनगर यांच्यावतीने सादरीरकरण करण्यात आले. कौशल्य विकास आणि मुद्रा बँक योजनेची सांगड घालून अधिकाधिक रोजगार संधी कशाप्रकारे निर्माण करता येऊ शकतील, त्यासाठी कोणकोणती क्षेत्र उपलबध आहेत याची माहिती या सादरीकरणातून देण्यात आली. www.udymimitra.in या वेबपोर्टलवर योजनेतील कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करता येतील अशी माहिती मुद्रा बँकेच्यावतीने यावेळी देण्यात आली.

यात अर्जदाराला आपल्या पसंतीच्या तीन बँकांची निवड प्राधान्य देऊन करता येते, अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाचे पुढे काय झाले याची माहिती देखील अर्जदाराला ई मेलद्वारे कळवली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी