आयोध्येत श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्याची तयारी सुरु

YOGI_Adityanath

टीम महाराष्ट्र देशा :अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर श्रीरामाचा 100 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याची योजना उत्तर प्रदेश सरकारकडून आखण्यात येत असून ‘नव्य अयोध्या’ या योजनेंतर्गत हा पुतळा साकारण्यात येणार आहे.पुतळा उभारण्यासाठीचा प्रस्ताव योगी सरकारनं राज्यपाल राम नाईक यांच्याकडे पाठवला असून पर्यटन विभागाचे प्रमुख सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी या प्रस्तावाचं प्रेझेंटेशन देखील दिलं आहे. राजभवनच्या प्रसिद्धीपत्रकातून या वृत्ताची खातरजमाही झाली आहे.

रामाच्या या भव्य पुतळ्याची उंची 100 मीटरच्या घरात राहण्याची शक्यता आहे. परंतु राज्यपाल राम नाईक यांनी अद्याप या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. उत्तर प्रदेश राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावामध्ये 18 ऑक्टोबरच्या दिवाळी सोहळ्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. दीपावलीच्या निमित्तानं 1,71,000 दीप प्रज्वलित करण्यात येणार आहे.

येत्या  दीपावलीच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अलफोन्स आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा उपस्थिती दर्शवणार आहेत. मात्र हा भव्य पुतळा उभारण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाच्या परवानगीचीही आवश्यकता आहे. अयोध्येचा विकास करण्यासंदर्भातील प्रकल्पाचा 195.89 कोटींचा आराखडा योगी सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. ज्यापैकी 133.70 कोटींचा निधी केंद्र सरकारनं उत्तर प्रदेश सरकारला सुपूर्दही केला आहे.