fbpx

देशमुखांच्या एन्ट्रीने बबनदादा आणि विजयदादा एकत्र

टीम महाराष्ट्र देशा – लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली तस तसे राजकारणात डाव पहायला मिळत असतात. खरतर राजकारणात कोण कोणाचा शत्रू आणि कोण कोणाचा मित्र नसतो असे म्हणतात.

माढा लोकसभेच्या निमित्ताने माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एन्ट्री झाली. त्यामुळे माढा लोकसभेला राष्ट्रवादीकडून देशमुख की मोहिते पाटील अशी चर्चा सुरु झाली. त्यामुळे माढा लोकसभेचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक मात्र कमालीचे अस्वस्थ पहावयास मिळत आहेत.

देशमुखांच्या या एन्ट्रीने माढ्याचे आमदार बबन दादा शिंदे आणि विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील मात्र एकत्र आलेले दिसत आहेत. याला निमित्त होते ते राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा. गेल्या पाच वर्षात बबनदादा आणि विजयदादा कधी एकत्र दिसले नाहीत. मात्र शेवटच्या दोन महिन्यांत ही नेतेमंडळी एकमेकांना जवळून ओळखू लागतात. खूप दिवसांपासून एकाच पक्षात असलेले परंतु एकमेकांची पाठही माहिती नसलेले हे दोन्ही दादा मात्र एकत्र आलेले दिसले.

सध्या खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुन्हा तयारी चालवली आहे. अचानक तिकीट कापले गेले तर त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे समजते आहे. तसेच निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस या भागात चांगलीच मोर्चे बांधणी सुरु केली आहे. पाणी, वीज, रस्ते, दुष्काळ असे विषय सोडवणाऱ्या उमेदवाराला लोकसभेत पाठवले जायला हवे, असे ते सांगताना दिसत आहेत.