आपत्ती निवारण विभागाच्या सुचनांची वाट न पाहता राज्यची तातडीची मदत, देशमुख यांनी मानले आभार

Amit Deshmukh

लातूर : राज्यातील अतिवष्टी व पुरामुळे शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे तातडीचे अर्थसहाय्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा राज्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
यासंदर्भाने प्रसिद्धिस दिलेल्या निवेदनात अमित देशमुख यांनी म्हटले आहे की, यावर्षी जुन ते ऑक्टोंबर या महिन्यात अनियमित पाऊस झाला. कधी जास्त तर कधी कमी पाऊस झाल्याने खरीप पिके तसेच ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात तर ऑक्टोंबर महिन्यात मराठवाडा, विदर्भ या भागात अतिवृष्टी झाली. पुरामुळे नदीकाठच्या शेतीतील पिकांबरोबर जमीनीही वाहुन गेल्या. अनेक घरांची पडझड झाली. वीज पडून काही शेतकरी मृत्युमुखी पडले. पशुधनाचेही मोठे नुकसान झाले.

राज्यातील जनतेला दिलेला शब्द पाळत महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या आपदग्रस्तांसाठी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेतला आहे. आपदग्रस्तांना तातडीने मदत देऊन त्यांना पुन्हा ताठ मानेने उभे करणे आवश्यक असल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या सुचनांची वाट न पाहता राज्य शासनाने ही तातडीची मदत जाहीर केली आहे. जुन ते ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील ५५ लाख हेक्टरहुन अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीसाठी जिराईत शेतीसाठी प्रति हेक्टर रुपये १०,०००/-, बागायत साठी रुपये १५,०००/- तर बहुवार्षिक पिकासाठी रुपये २५,०००/- प्रतिहेक्टर मदत देण्यात येणार आहे.

विमाकंपन्यांकडूनही भरपाई मिळणार : आपदग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे आवश्यक असल्यामुळे राज्य शासनाने रुपये १० हजार कोटीची ही मदत दिली आहे. या मदतीशिवाय विमा कंपन्यांकडूनही नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशिल आहे. त्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया पुर्ण करण्यात येत असल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या