माढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग

कुर्डूवाडी – (हर्षल बागल) सोलापुर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जात होता. त्यामुळे खा. शरद पवार यांचे माढा लोकसभा मतदार संघावर विशेष लक्ष आहे. पण सध्या माढा मतदार संघाला अंतर्गत गटबाजीने पोखरल्याने मागील पाच वर्षात पक्षाची बरीच नाचक्की झालेली पाहवयास मिळत आहे. या गटबाजीला रोखण्यासाठी खा. शरद पवार यांची एक पावरफुल खेळी समोर येताना दिसत आहे.

खा. विजयसिंह मोहिते पाटिल, आ. बबनदादा शिंदे आणि जि.प. अध्यक्ष संजय शिंदे व करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल यांच्यातील वाद हा संपूर्ण राज्याला परिचित आहे. येणाऱ्या लोकसभेला मोहिते पाटिल यांना उमेदवारी दिली गेली तर, शिंदे व बागल गट पुर्ण ताकतीनिशी लोकसभा निवडणुकीचे काम करेल का? यावर ज्या त्या गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मौन आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून मोहिते पाटिल यांना उमेदवारी दिली किंवा ते लोकसभेला उभा राहिले तर त्यांच्या विरोधात जि.प. अध्यक्ष संजय शिंदे हे दंड थोपटून तयार आहेत. मोहिते पाटिल व संजय शिंदे हा वाद राज्यात राष्ट्रवादीला परवडणारा नाही. राष्ट्रवादीला या गटबाजीचा तोटा होण्याची शक्यता आहे. हीच बाब शरद पवार यांनी ओळखली.

त्यानुसार शरद पवार यांनी त्यांची खेळी सुरु केली, या गटबाजीशी सबंधीत नसणारे व मोहिते पाटिल तसेच शिंदे , बागल यांच्याबरोबर निकटचे सबंध असलेले तसेच राष्ट्रवादी पक्षाचे एकनिष्ठ म्हणुन सध्या माढा मतदार संघात दौरे करित असलेले माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची चाचपणी पवार करताना दिसत आहेत. ही गटबाजी रोखण्यास मोठी मदत होऊ शकते. गटबाजी थांबली पाहिजे राष्ट्रवादीचे पुर्वीचे दिवस जिल्ह्यात आले पाहिजेत हि सामान्य कार्यकर्त्याची खदखद आहे. हीच खदखद भरुन काढण्यासाठी पवार कदाचित देशमुखांचे लाँचिंग करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रभाकर देशमुख हे गेल्या तीन महिन्यापासुन माढा लोकसभा मतदार संघात दुष्काळाच्या झळा पाहत त्यावर आपण काय करु शकतो याचा पंचनामा करत सर्वत्र गावोगावी दौरे करत आहेत. दुष्काळ, पाणी, गटशेती, शिक्षण, रोजगार , यावर गावकट्यावर उभा राहून शेतकरी व युवकांशी सवांद साधत आहेत. आगामी काळात ही शरद पवारांची मोठी खेळी कितपत यशस्वी होते हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.

मोहिते पाटिल-शिंदे-बागल हा त्रिमुर्ती वाद सपंवण्यासाठी प्रभाकर देशमुख यांना संधी द्यावी असे कोणत्याही गटात न काम करता थेट पक्षाच्या विचाराने काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला सातत्याने वाटत आहे. खुद्द पवार यांनीच देशमुखांना दौरे करण्यास सांगुन गटबाजी रोखण्याचे मोठे ओझे त्यांच्या खांद्यावर टाकले आहे . देशमुखांचे लाँचिंग करताना मोहिते पाटिल यांचे राज्यात पुनर्वसन करणे हे देखील तितकेच पक्षाच्या दृष्टीकोनातून महत्वाचे ठरणार आहे.

Loading...