उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर, साताऱ्यात; पूर परिस्थितीचा आढावा घेणार

ajit pawar

कोल्हापूर : राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा येथील पूर परिस्थिती अजूनही बिकट आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवस पावसाने उघडीप दिली असली तरी महापुरासह नैसर्गिक आपत्तीची संकटे सुरूच आहेत. महापूर संथपणे ओसरत असताना राधानगरी धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. रविवारी सायंकाळी या धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू झाल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली.

महापूराने कोल्हापूरात मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते कोल्हापुर आणि शिरोळ येथील पूरग्रस्थाना भेटून माहिती घेणार आहेत तसेच एकूण मदत कार्याबाबत आढावा घेतील. तसेच ते सांगली जिल्ह्यातील पलूसमध्येही पाहणी करणार आहेत.

अजित पवारांचा दौरा पुढीलप्रमाणे
आज सोमवारी सकाळी ९ वाजता हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. ९.१५ ते १० वाजेपर्यंत पूरग्रस्त परिसर पाहणी- शाहू सांस्कृतिक हॉल येथे पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट. शिवाजी पूल पूरग्रस्त परिसर पाहणी. १०.१५ वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीची आढावा बैठक (स्थळ : शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर). बैठकीनंतर कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण.
११.३० वाजता हेलिकॉप्टरने श्री. दत्त शेतकरी सहकार साखर कारखाना लि. हेलिपॅड, ता. शिरोळकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता शिरोळ परिसर पूरग्रस्त पाहणी करुन दुपारी १.१५ श्री. दत्त शेतकरी सहकार साखर कारखाना लि. हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने सांगलीकडे प्रयाण.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील पुराचे पाणी अद्यापी कायम असल्याने राष्ट्रीय महामार्ग रविवारीही बंद राहिला. रविवारी दुपारी महामार्गावरील वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने चाचणी घेतली. पण महामार्गावर अद्याप ८ फुटांइतके पाणी असल्याने रविवारी महामार्गावरील वाहतूक सुरू होऊ शकली नाही. काही जिल्हा मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या