‘आम्ही चंद्र, सूर्य मागत नाही, जे व्यवहार्य असेल तेच आम्हाला द्या; पवारांनी घेतली शाहू महाराजांची भेट !

shahu maharaj - ajit pawar

कोल्हापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जूनला रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. मराठा समाजच्या मागण्यांवर विचार नाही झाला तर पुण्यातून मंत्रालयावर लॉंगमार्च काढण्याचा थेट इशारा देखील खा. संभाजीराजे यांनी दिला आहे.

त्यानंतर आता राज्याचे राजकारण तापले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये आज छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली आहे. अजित पवार आज कोरोना आढाव बैठकीसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत त्यावेळी ही भेट झाली. तासभर झालेल्या या बैठकीत मराठा आरक्षण या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती छत्रपती शाहू महाराज यांनी दिली आहे.

अजित पवार व आमच्यात सर्व गोष्टींमध्ये चर्चा झाली आहे. समाजासाठी जास्तीत जास्त जे चांगलं करता येईल ते करा असं मार्गदर्शन केलं आहे, असं शाहू महाराजांनी म्हटलं आहे. ‘आम्ही चंद्र, सूर्य मागत नाही. जे शक्य आणि व्यवहार्य असेल ते आम्हाला द्या. ठाकरे सरकारनं जे प्रयत्न सुरू केलेत ते समाधानकारक आहेत. कोर्टानं दिलेला निकाल खोडून काढणं आणि फेरविचार याचिका दाखल करणं या गोष्टी सरकारनं तातडीनं कराव्यात,’ असंही शाहू महाराज यांनी म्हटलं आहे.

तर, ‘मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे ते सर्व केलं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचं लक्ष असून यापुढेही राहणार आहे, असं शाहू महाराजांनी म्हटलं आहे. तसंच, आंदोलनाबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही,’ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP