डेंग्यूने घेतले राज्यात २१ जणांचे बळी

dengu news for pune

पुणे : डेंग्यूने आजारी पडलेल्या रुग्णांची संख्या राज्यात ४७९७ झाली असून आतापर्यंत २१ रुग्णांचा बळी या तापाने घेतला आहे. चिकुनगुन्याच्या रुग्णांची संख्याही ८२० वर पोहोचली आहे. डासांमुळे होणाऱ्या या दोन्ही रोगांमुळे महाराष्ट्र फणफणला आहे.नोंद झालेल्या डेंग्यू रुग्णांपेक्षा प्रत्यक्षातल्या रुग्णांची संख्या जास्त असण्याची चिन्हे आहेत.

या सर्व रुग्णांची नोंद करुन प्रभावी उपचार करण्याबाबतचे पत्र राज्य कीटक नियंत्रण विभागाने इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, फेडरेशन ऑफ ओबेस्ट्रिक अँड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि इतर वैद्यकीय संघटनांना पाठवले आहे.

मात्र खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची नोंद करण्यात हेळसांड केली जात आहे. त्यामुळे वेळप्रसंगी अशा डॉक्टर व रुग्णालयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.आरोग्य खात्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, डेंग्यू, चिकुनगुन्या या डासांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रकोप अलीकडच्या काही वर्षांत वाढलेला आहे.

Loading...

यापैकी डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावर प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाहीत. दरम्यान, पुणे मनपा आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात १५ ते ४४ वयोगटातील महिला डेंग्यूला बळी पडत असल्याचे आढळून आले आहे. महापालिकेने ३०७ रुग्णांची पाहणी करून हा निष्कर्ष काढला.

या वयोगटातल्या स्त्रिया शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदींच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत असतात. शहराच्या वेगवेगळ्या भागांशी संपर्कात अाल्याने त्यांना या अाजाराची लागण हाेते, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.