शेतक-यांसाठी झटणारा प्रामाणिक नेता गमावला: शरद पवार

पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. लोकसभेत प्रामाणिकपणे शेतक-यांची बाजू मांडणारा आणि सहकार चळवळीचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करणारा एक नेता गमावला अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे शुक्रवारी संध्याकाळी राहत्या घरी निधन झाले. विखे पाटील यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विखे पाटील यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्म्याला शांती मिळो. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या भावना विखे पाटील यांच्यासमवेत आहे असे मोदींनी ट्विटरवर म्हटले आहे. कृषी, ग्रामीण विकास, शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील असे मोदींनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विखे पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. कृषी, सहकार, ग्रामविकास, शिक्षण, आर्थिक या क्षेत्रांमध्ये दिशादर्शक कामगिरी करणारे व्यक्तिमत्व राज्याने गमावले अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून परिपूर्ण ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल सादर केले होते. ग्रामीण भागाच्या परिवर्तनाची नस जाणणा-या मोजक्या नेत्यांमध्ये बाळासाहेब विखे पाटील यांचा समावेश होता असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.