मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटेंची नार्कोटेस्ट करा

maratha dalit nete

पुणे: भिडे गुरुजींबद्दल आदर आहे आणि आदर राहाणार तसेच दंगलीशी त्यांचा काय संबंध पण नाही, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही असं ठामपणे सांगत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले भिडे गुरुजींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले असताना मिलिंद एकबोटे आणि संभाजी उर्फ मनोहर भिडे व त्यांच्या समर्थकांना अटक करून नार्कोटेस्ट केली जावी अशी मागणी दलित-मराठा संघटनांच्या काही नेत्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली आहे. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दोन्ही समाजाच्या नेत्यांकडून आज पुण्यात सांगण्यात आलं आहे. तसेच येत्या काळात मराठा दलित सामाजिक सलोखा परिषद घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं आहे.

bhide guruji and udhanraje bhosle

भिडे गुरुजींवर आरोप होत असताना उदयनराजे गुरुजींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिल्याचं चित्र आज पहायला मिळाले .मात्र मराठा संघटनांच्या काही नेत्यांनी आणि दलित संघटनांच्या काही नेत्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत एकबोटे आणि संभाजी उर्फ मनोहर भिडे व त्यांच्या समर्थकांना अटक करून नार्कोटेस्ट केली जावी अशी मागणी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेला पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, मराठा क्रांती मोर्चाचे शांताराम कुंजीर. उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, मराठा महासंघाचे प्रवीण गायकवाड. आरपीआय शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, दलित नेते राहुल डबाळे आदी नेते उपस्थित होते.

दोन्ही समाजातील नेत्यांच्या प्रमुख मागण्या

  • जातीय तेढ वाढवणाऱ्या दंगेखोरांवर आणि त्यांचे मास्टर माईंड यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी.
  • दंगलीचे सूत्रधार असणारे मिलिंद एकबोटे आणि संभाजी उर्फ मनोहर भिडे व त्यांच्या समर्थकांना अटक करून नार्कोटेस्ट केली जावी.
  • दंगलीमध्ये नुकसानग्रस्त लोकांना भरपाई देण्यात यावी.
  • घटनेतील मयत राहुल फटांगडे यांचे कुटुंबियांस 25 लाखांची मदत करण्यात यावी.
  • घटनेत जखमी लोकांना 2 ते 5 लाखांची मदत करण्यात यावी.
  • 28 डिसेंबरला वढूत झालेल्या घटनेची चौकशी करून सुत्रधारांवर कारवाई करण्यात यावी.
  • भीमा कोरेगाव विजयस्थंभास 24 तास सुरक्षादेण्यात यावी
  • अट्रोसिटीसह अन्य कोणतेही खोटे गुन्हे दाखल होऊ नये याची खबरदारी घेतली जावी.