रेल्वेतील पॅन्ट्री चालकाला मनसेच्या शहराध्यक्षाने मागितली दोन लाखांची लाच

परभणी : राजकीय वजन वापरून लाचखोरी केल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वेतील पॅन्ट्री चालकाकडे लाच मागितल्याप्रकरणी परभणीचा मनसे शहराध्यक्ष सचिन पाटीलला अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांनी कारवाई करत सचिन पाटीलला अटक केली असून आणखी एकजण फरार आहे. न्यायालयाने सचिन पाटीलला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपोवन एक्स्प्रेसमध्ये रेल्वेने नेमून दिलेल्या दरांपेक्षा जास्त दराने खाद्य पदार्थांची विक्री केली जाते. याबाबत ऑक्टोबर महिन्यात मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी याबाबत आंदोलन केलं होतं. तर अनेक तक्रारीही दाखल केल्या होत्या. मात्र यानंतर मनसेचा शहराध्यक्ष सचिन पाटीलने रेल्वेतील पॅन्ट्री चालकाकडे एक ते दोन लाखांची लाच मागितली होती.

तपोवनमधील पॅन्ट्रीकार सुपरवायझर अशोक चतुर राठोड यांनी लोहमार्ग पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार सचिन पाटीलला अटक करण्यात आली तर उत्तम चव्हाण हा पसार झाला आहे. पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचे काम या शहराध्याक्षाने केले असल्याची चर्चा सोशल मिडीयावर होऊ लागली आहे. मनसे या लाचखोर शहराध्याक्षवर नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.