सत्तेत नसताना ‘सरसकट’ मागणी, मग आता ‘पंचनामे’ कशाला ?

chandrakant patil and uddhav thakrey

मुंबई : सद्या शेतकऱ्यांवर चहू बाजूनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा असा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला दोन दिवसांपपूर्वी झालेल्या पावसामुळे हाती आलेलं सोन्यासारखं पिक देखील गमवावं लागलं आहे.

गेल्या ४-५ दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत, मात्र आता वेळ उलटून गेली आहे. मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे, असा टोला भाजप खासदार नारायण राणे यांनी लगावला होता. आता, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. राज्यात भाजपचं सरकार असताना सरसकट कर्जमाफी व मदत करा अशी मागणी करणाऱ्या  उद्धव ठाकरेंनी आता पंचनाम्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता पंचनामे कशाला? असा सवाल त्यांनी केला आहे.

तर, सरकारने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी देखील चंद्रकांत पाटलांनी केली आहे. जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा केंद्राने मदत केली आहे. त्यामुळे मदत येईपर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, असं देखील ते म्हणाले. तसंच, अखेर मुख्यमंत्री घराबाहेर पडल्याने त्यांचं अभिनंदन असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-