अनलॉक होताच एमपीएससीच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्याच्या मागणीने धरला जोर

mpsc

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षांबाबत आता शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षांची तारीख लवकर जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

११ एप्रिल रोजी होणारी संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुढे ढकलण्यात आली होती. आता त्याचे नियोजन करून ती परीक्षा घेण्यास प्राधान्यक्रम देण्यात यावा, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट राइट्स संघटनेकडून करण्यात आली आहे. एमपीएससी परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव खूप असताना उमेदवारांच्या सुरक्षिततेसाठी पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याने शासनाने परीक्षांबाबत निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे मत संघटनेचे महेश बडे यांनी व्यक्त केले.

संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब ही परीक्षा मागील वर्षापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वारंवार पुढे ढकलण्यात आलेली. राज्य शासनाने या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी वेळोवेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला होता. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तसेच विविध जिल्हे देखील अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने केलेल्या योग्य उपाययोजनांमुळे ही संख्या आटोक्यात आणण्यात राज्य शासनाला यश आलेले आहे.त्यामुळे आता राज्य शासनाने एमपीएससी परीक्षांबाबत लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे. परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्व तयारी केली असल्याचे समजत आहे. यामुळे आता ही परीक्षा लवकर घेणे अपेक्षित आहे. कारण परीक्षा वारंवार पुढे गेल्यामुळे उमेदवारांचे वय वाढत आहे. तसेच त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मानसिक ताण, कौटुंबिक त्रास, सामाजिक दबाव अशा विविध कारणांना या उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहे.

मागील संयुक्त पूर्व परीक्षा मार्च 2019 मध्ये झालेली आहे.तसेच जी परीक्षा 2020 मध्ये होणार ती देखील अजून होऊ शकलेली नाही. त्यामुळे याठिकाणी शासनाने उमेदवार व त्यांचे पालक कोणत्या मानसिकतेमध्ये असतील याचा देखील सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे संयुक्त पूर्व परीक्षा गट – ब जुलै महिन्यात परीक्षा घेण्यास प्राधान्य क्रम देण्यात यावा.तसेच शासना समोर काही अडचणी येत असतील तर राज्य शासनाने परीक्षा कधी होईल याची तारीख उमेदवारांना कळविणे आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांना पुढील नियोजन करणे सोपे जाणार आहे. ही परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी आयोगाकडून योग्य ती उपाय योजना करण्यात आली असल्याचे देखील समजत आहे. तसेच उमेदवारांकडून देखील योग्य ती दक्षात पाळण्यात येईल. त्यामुळे राज्य शासनाने या परीक्षांची तारीख लवकरच घोषित करणे आवश्यक आहे. याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP