fbpx

दिवंगत संजय कोतकर यांच्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी देण्याची मागणी

shivsena flag

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- महाराष्ट्रात खळबळ माजविणाऱ्या अहमदनगर येथील केडगाव शिवसैनिक हत्याकांडानंतर राजकीय पोळ्या भाजणार्यांनी आपले स्वार्थी उद्योग बंद करावेत व शिवसेनेसाठी आयुष्यभर मरेपर्यंत झटलेल्या आणि शेवटी राजकीय वादातूनच हत्या झालेल्या कै.संजय कोतकर यांच्या पत्नीला येणाऱ्या विधानसभेची उमेदवारी देऊन आमदार करावे आणि हीच खरी या दोनही हत्या झालेल्या शिवसैनिकांना श्रद्धांजली असेल व यानंतरच या कुटुंबियांना न्याय मिळेल असे मत नगर तालुका शिवसेना माजी प्रमुख श्रीराम येंडे यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून ही भूमिका मांडून हीच सर्व शिवसैनिकांची ईच्छा व भूमिका असल्याचे सांगितले आहे. या पत्रकात येंडे यांनी विविध दाखले देत शिवसेना नेत्यांनी याचा सहानुभूती पूर्वक विचार करावा असेही आवाहन केले आहे.

२०१९ साली होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कोतकर यांच्या पत्नीस शिवसेनेनं उमेदवारी देत आमदार करण्याची मागणी शिवसैनिकांची असल्याचे येंडे यांनी म्हटले आहे. तर याबाबतीत व अशा प्रसंगी अनेक यापूर्वी घडलेले प्रसंग त्यांनी सांगत काही दाखले दिले आहेत. ते पुढे म्हणाले की, जसे देश पातळीवर राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधी यांना संधी देण्यात आली. नाशिक येथील आमदार हिरे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला संधी दिली गेली. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर मुलगी पूनम महाजन यांच्या खासदार करण्यात आले. आर.आर.पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीस आमदारकी बहाल करण्यात आली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पक्षाने मुलींना आमदार अन खासदार केले. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर मुलाला काँग्रेसने आमदार केले. अशाच प्रकारे कोतकर कुटुंबीयांना म्हणजे संजय कोतकर यांच्या पत्नीलाही ही संधी मिळावी व त्यांना सर्वजनांनी मदत करावी आणि आमदार करावे यासाठी सर्व शिवसैनिक जीवाची बाजी लावतील व त्यांना आमदार करतील असेही ते म्हणाले.

अहमदनगर मध्ये घडलेल्या अशा प्रसंगावर त्यांनी सांगितले की, अहमदनगर शहरातील महापालिका वॉर्ड क्र.२ मधील अशोक भांगरे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. तसेच जगदिश भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडीलांना आमदारकी देण्याचे सर्वानुमते ठरले होते. परंतु त्यावेळी स्वार्थी आमदारांनी वेगळीच चाल खेळत शहराची आमदारकी आपल्या पदरात पाडून घेतली होती. या सर्वाचा विचार करणे गरजेचे आहे. यासाठी येणा-या २०१९ निवडणुकीत नगर शहरातील शिवसेनेचे आमदारीकीचे तिकिट संजय कोतकर यांच्या पत्नीला मिळावे व त्यांना सर्व शिवसैनिकांनी आमदार करावे आणि हीच खरी कै. संजय कोतकर यांना श्रद्धांजली असेल असेही त्यांनी सांगितले.

कै. संजय कोतकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी नगर शहराचे माजी आमदार यांनी श्रध्दाजली वाहताना त्यांनी कोतकर हे शिवसेनेचे सच्चा सैनिक असल्याचे सांगितले होते, तसेच माझ्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेसाठी काम केले असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी पक्षप्रमुखांना सांगून कै.कोतकर यांच्या पत्नीस उमेदवारी द्यावी. तसेच त्यांच्या मरणानंतर राजकिय पोळ्या भाजणे बंद कराव्यात असेही श्रीराम येंडे यांनी म्हटले आहे.