मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या – रामदास आठवले  

ramdas athawale

मुंबई   – संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खासदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित केली होती.त्या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करून राज्यात प्रलंबित असणाऱ्या केंद्र सरकार च्या योजना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार मध्ये प्रयत्न करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

महाराष्ट्रातील रस्ते अन्य राज्यांच्या तुलनेत खराब असून त्यांची दुरुस्ती करण्यासाठी त्यातील काही रस्ते राष्ट्रीय महामार्ग केल्यास त्या रस्त्यांच्या कामासाठी केंद्र सरकार कडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यासाठी राज्यातील कोणते रस्ते राष्ट्रीय महामार्ग करणार त्याचा प्रस्ताव राज्य सरकार ने तयार करावा अशी सूचना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस ला द्यावे आणि ग्रँट रोड रेल्वे स्टेशन ला नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचे नाव द्यावे अशी सूचना  रामदास आठवले यांनी केली. मुंबईत विमानतळ आणि मध्य रेल्वे च्या टर्मिनस छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी मुंबई राहिली आहे. त्यांचे राजगृह निवासस्थान आणि चैत्यभूमी हे स्मारक मुंबईत आहे.मुंबईत मुंबई सेंट्रल हे देशातील एक मोठे टर्मिनस आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रल या टर्मिनस ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी आरपीआय ची मागणी असल्याचे रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

नाना जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबई चे शिल्पकार म्हणून त्यांचा आम्हाला नितांत आदर आहे त्यांचे नाव ग्रँट रोड स्टेशनला किंवा अन्य कोणत्याही रेल्वे स्टेशनला द्यावे मात्र मुंबई सेंट्रल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी आमची मागणी असल्याचे रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

महत्वाच्या बातम्या