सोशल मीडियावरून जितेंद्र आव्हाडांना शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाई करा

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. तर जितेंद्र आव्हाड यांना आता सोशल मीडियावरून धमक्या सुद्धा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे ठाणे  शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे  सोशल  मीडियावरून शिवीगाळ करणाऱ्या समाजकंटकांंवर  कारवाई करा अशी मागणी केली आहे.

परांजपे यांनी ही मागणी पत्राद्वारे केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात असे लिहिले आहे की, करमुसेने गलिच्छ शब्दांमध्ये गेली चार वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कार्यकर्ते यांच्याविरु द्ध लिखाण केले आहे. आव्हाड यांच्याविरु द्ध अत्यंत अर्वाच्च भाषेत मेसेजही टाकले आहेत. एकीकडे वैचारिक युद्ध चालू असताना निष्कारण अश्लील भाषेचा वापर करुन वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होतो. खून, बलात्कारासारख्या धमक्या दिल्या जातात. यांच्याविरु द्ध कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला तर निष्कारण दोष दिला जातो. याबाबत योग्य ती कारवाई करावी, असे त्यांनी लिहिले आहे.

दरम्यान दुसरीकडे भाजप नेते मारहाण झालेल्या व्यक्तीच्या बाजूने असून जितेंद्र आव्हाड यांनी न्याय प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचे बोलत आहेत. ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, आव्हाडांच्या ठाण्यातील निवासस्थानी झालेला मारहाणीचा प्रकार हा न्यायव्यवस्थेला काळीमा फासणारा आहे. पोलिसांच्या उपस्थितीतच ही मारहाण झाली. तिथे झालेल्या मारहाणीच्या वेळी आव्हाड हे उपस्थित असल्याचा फिर्यादीमध्ये उल्लेख आहे. वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करताना केवळ एक अनोळखी आरोपी अशी फिर्याद नोंदवली. या प्रकरणात आव्हाड यांच्या नावाचीही नोंद करावी. याप्रकरणी सुरक्षा दलातील पोलिसांचे निलंबन करुन चौकशी करावी.

सोशल मीडियावर आनंद करमुसे शिवीगाळ करत असल्याने त्याला निवासस्थानी आणून जितेंद्र आव्हाड यांनी मारहाण केल्याचं म्हंटल जात आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड काहीसे वादाच्या आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.