राजीव गांधी बाबतच्या मोदींच्या वादग्रस्त वक्तव्याचा दिल्ली विद्यापीठाच्या शिक्षकांकडून निषेध

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विरोधकांना सतत लक्ष केले जात आहे. विरोधकांवर टीका करताना नरेंद्र मोदी वादग्रस्त आणि अपमानास्पद वक्तव्य करत आहेत.नुकत्याच एका सभेत पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून समाजस्तरातून मोदींच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. यानंतर आता शिक्षण क्षेत्रातल्या दिग्गजांनीदेखील मोदींच्या विधानाचा समाचार घेतला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या २०० शिक्षकांनी मोदींच्या विधानाबद्दल तीव्र आक्षेप नोंदवत निषेध केला आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या शिक्षकांनी पत्रातून राजीव गांधी यांच्या बाबतचे पुरावे दिली आहेत. पत्रात असे म्हंटले आहे की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची कामगिरी ही उल्लेखनीय असून त्याची जाण संपूर्ण देशाला आहे. अनेकदा देशानं त्यांच्या कामाचं कौतुक देखील केलं आहे. जेव्हा कारगिलमध्ये भारतानं विजय मिळवला, तेव्हा आपल्या जवानांनी राजीव गांधींचं कौतुक करत घोषणा दिल्या होत्या. मात्र मोदींनी राजीव गांधी यांच्या बाबत वक्तव्य करताना तमा बाळगली नाही त्यामुळे आमचा निषेध आहे.

‘मोदींनी राष्ट्राच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या राजीव गांधींचा अपमान केला आहे. मोदींचं विधान पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारं आहे. याआधी कोणत्याही पंतप्रधानानं इतकी खालची पातळी गाठली नव्हती,’ अशा कठोर शब्दांत शिक्षकांनी मोदींचा निषेध केला आहे. शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या असलेलं हे पत्र काँग्रेस नेते सॅम पित्रोडांनी ट्विट केलं आहे.

राजीव गांधी म्हणजे भ्रष्टाचारी नंबर वन

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांच्याकडून नरेंद्र मोदींवर राफेल घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. तर मोदी यांनी पलटवार करत राजीव गांधी यांचा जीवनप्रवास भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात संपल्याची टीका केली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना रोषाला सामोरे जावे लागत आहे.