‘शेतकरी नेत्यांनी दिलेलं वचन पाळलं नाही;आता आमच्याकडून कोणतीही दया दाखवली जाणार नाही’

delhi police

नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली.

या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले. देशभरातून दिल्ली पोलिसांनी प्राणपणाने लढत दाखविलेल्या अतुल्य पराक्रमाचे, धैर्याचे आणि संयमाचे कौतुक होत आहे. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी शेतकरी नेत्यांनी दिलेलं वचन पाळलं नाही, असा दावा करत हिंसाचाराला कारणीभूत असलेल्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, अशा शब्दांत कडक कारवाईचा इशारा दिला.

“जेव्हा शेतकरी नेत्यांना परवानगी देण्यात आली तेव्हा त्यांना लिखित स्वरुपात सांगण्यात आलं होतं की, त्यांनी ५००० पेक्षा अधिक ट्रॅक्टर परेडमध्ये समाविष्ट होता कामा नयेत तसेच त्यांच्याजवळ कोणतीही हत्यारं असता कामा नयेत. मात्र, तरीही शेतकऱ्यांनी पोलिसांच्या निर्देशांचे उल्लंघन करत बॅरिकेट्स तोडून हिंसाचार केला असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये घडलेल्या हिंसक घटनांनंतर दिल्ली पोलिसांनी एकूण २५ खटले दाखल केले आहेत.काही शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघटन आणि भारतीय किसान युनियन या संघटनांनी आंदोलनातून माघार घेतल्याचं काल जाहीर केलं.

महत्वाच्या बातम्या