दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा!

जय शिवाजी...जय भवानी...च्या जयघोषाने गरजली दिल्ली, महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक

नवी दिल्ली : काल प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली जय शिवाजी…जय भवानी… च्या मराठी घोषणांनी दणाणली होती. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे. प्रजासत्ताक दिनी राजपथावर विविध राज्यांचे तसेच दूरदर्शन, सैन्यदलासह विविध खात्यांचे चित्ररथ साकारण्यात आले होते. महाराष्ट्राने यावर्षी शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ साकारला होता.

ज्या दिल्लीनं छत्रपतींच्या स्वराज्याला कायम कमी लेखलं, ज्या दिल्लीश्वरांशी झगडण्यात शिवरायांचं आयुष्य खर्ची पडलं त्याच दिल्लीत छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा चित्ररथ दिमाखात अवतरला. देशभरात ६९वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला मात्र दिल्ली गरजली ती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने. आसियान अर्थात असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन्स या आग्नेय आशियातील १० देशांचे प्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विविध राज्यांचे चित्ररथ राजपथावर दाखल झाले. यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथाने देशाचं लक्ष वेधून घेतलं. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळ्याचा चित्ररथ महाराष्ट्राने राजपथावर उतरवला. यावेळी उपस्थित असलेल्या खासदार संभाजीराजे भोसले यांनी उभं राहून जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. एकूणच या चित्ररथाची संकल्पना कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली होती.

चित्ररथ विशेष

चित्ररथावर शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा सादर करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती असून त्यावर शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली.
तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती होती. त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झाले. आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवण्यात आलं होतं. तर दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे असून. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ.

You might also like
Comments
Loading...