fbpx

हुश्श… अखेर मुख्यमंत्र्यांची कार सापडली !

टीम महाराष्ट्र देशा: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कार दिल्लीकरांसाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर केजरीवाल यांनी व्हीआयपी सुविधा नाकारत वॅगन आर या साध्या कारला प्राधान्य दिले होते. ही कार त्यांना आप समर्थक कुंदन शर्मा यांनी दिली होती.

दोन दिवसांपूर्वी ही केजरीवाल यांची बहुचर्चित कार चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली होती. मुख्यमंत्र्यांनी तर नायब राज्यपाल अनिल बैजल यांना पत्र पाठवून दिल्लीतील कायदे आणि सुव्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली होती. पण अखेर अरविंद केजरीवाल यांची चोरीला गेलेली कार अखेर सापडली आहे. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे ही कार सापडली असून कार उत्तर प्रदेशमध्ये कशी पोहोचली, हे देखील अद्याप समजू शकलेले नाही.

अरविंद केजरीवाल यांची निळ्या रंगाची वॅगन आर कार दोन दिवसांपूर्वी दिल्ली सचिवालयाबाहेर पार्क करण्यात आली होती. दुपारी एकच्या सुमारास त्यांची कार चोरीला गेल्याचे समोर आले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती. केजरीवाल यांनी यावरुन दिल्ली पोलिसांच्या कारभारावर टीकास्त्र सोडले होते. दुसरीकडे पोलिसांनी केजरीवाल यांच्या कारचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. अखेर शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे केजरीवाल यांची कार बेवारसस्थितीत सापडली आहे.