पर्रीकरांचा अमेरिकेतील मुक्काम वाढला; जूनमध्ये भारतात परतण्याची शक्यता

नवी दिल्ली – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर सध्या अमेरिकेतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते अमेरिकेला रवाना झाले होते. तत्पूर्वी त्यांच्यावर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.

दरम्यान अमेरिकेत स्वादुपिंडाच्या संबंधी आजारावर उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मे महिन्यात भारतात परतणार होते. त्यांनी याबाबत एक व्हिडीओ देखील प्रसिद्ध केला होता. आपण लवकरच गोव्यात परतणार असल्याचं या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हंटलं होते.

दरम्यान आता पर्रीकर यांचे गोव्यात आगमन होणे लांबणीवर पडले आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्री गोव्यात दाखल होतील, असे यापूर्वी सांगितले गेले, तरी मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्री पर्रीकर हे येत्या जून महिन्याच्या दुस-या पंधरवड्यात गोव्यात येण्याची शक्यता आता शासकीय पातळीवरून व्यक्त होत आहे.

पर्रीकर हे तीन महिने अमेरिकेतील एका इस्पितळात उपचार घेत आहेत. जेव्हा उपचार सुरू नसतात तेव्हा ते इस्पितळाच्या परिसरातच एका अपार्टमेन्टमध्ये राहतात. कधी त्यांचा पुत्र तर कधी मुख्यमंत्र्यांच्या गोव्यातील कार्यालयातील अधिकारी तिथे भेट देऊन येत असतात. पर्रीकर यांना उपचारानिमित्ताने इस्पितळाच्या परिसरातच रहावे लागते.