शांतता व संयम राखून समाजविघातक, धर्मांध शक्तींचा कुटील डाव हाणून पाडाः खा. अशोक चव्हाण

मुंबई-  औरंगाबाद शहरातील हिंसाचाराची घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करित आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता आणि संयम राखून समाजात फूट पाडणा-या समाजविघातक,धर्मांध शक्तींचा हा कुटील राजकीय डाव हाणून पाडावा असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे.

काही समाजकंटकांनी औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ करून हिंसाचार घडवला आहे. या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला आहे. दंगेखोरांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. जाळपोळीत 100 पेक्षा जास्त दुकाने जळून खाक झाली असून कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. रात्रभर समाजकंटक हैदोस घालत असताना पोलीस काय करत होते? इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ होईपर्यंत पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना का केली नाही? सरकारचा दंगेखोरांना पाठिंबा आहे का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहेत.

राजकीय फायद्यासाठी दंगली घडवण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करित आहेत, हे गेल्या काही दिवसातील घटनांमधून स्पष्ट झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका आल्या की अशा घटना घडतात हे दिसून आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता व संयम राखून या समाजविघातक धर्मांध शक्तींचे मनसुबे उधळून लावावेत असे आवाहन औरंगाबादच्या नागरिकांना करून सरकारने दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.