fbpx

उदयनराजेंचा रामराजे यांच्या शेजारी बसण्यास नकार

टीम महाराष्ट्र देशा – साताऱ्यातील दोन राजांच्या मनोमिलनाचे वारे सध्या वाहत आहे. फलटणचे राजे,विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील दुरावा मात्र कायम असल्याचे दिसत आहे.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले सगळे वाद विसरून पुन्हा एकत्र येण्याची तयारी केली आहे. यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी प्रयत्न केले आहेत.

रविवारी जिल्हा बॅंकेच्या सभागृहात माजी खासदार कै. लक्ष्मणराव पाटील यांच्या सर्वपक्षिय शोकसभेवेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम सुरू झाला होता. खासदार उदयनराजे या कार्यक्रमाला थोडे उशीरा आले. उदयनराजे आल्यानंतर त्यांनी लक्ष्मणराव पाटील यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली. उदयनराजेंना पाहून रामराजेंच्या शेजारी बसलेले कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे खूर्चीतून उठले व शेजारीच्या खुर्चीत बसले. त्यांनी रामराजेंच्या शेजारी मोकळ्या असलेल्या खूर्चीत बसण्यासाठी येण्याची सूचना उदयनराजेंना केली. पण उदयनराजेंनी नकार देत एका बाजूला भाजपचे नेते डॉ. दिलीप येळगांवकर यांच्या शेजारी बसणे पसंत केले.

तरीही त्यांनी दोन ते तीन वेळा उदयनराजेंना सभापती रामराजेंच्या शेजारील खूर्चीत बसा, अशी विनंती केली पण उदयनराजेंनी नकार देत आहे त्याच ठिकाणी बसले.